पुणे : करोनामुळे मृत पावलेल्या बांधवांच्या अस्थी विसर्जनाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आळंदी किंवा इतर ठिकाणी अस्थी विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
असे असताना पुण्यातील संगम घाटावर काम करणारे तिकोने बंधू हे गेले अनेक दिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणताही मोबदला न घेता दिवसभर घाटावर अस्थी विसर्जन करण्यासाठी आलेल्या बांधवांना स्वतःच्या नावेत बसवून नदी पात्रात घेऊन जात विसर्जनाचे हे पुण्यकर्म करीत आहेत. भोई प्रतिष्ठान तर्फे काळूराम, बापू आणि जगन शंकर तिकोने यांचा त्यांच्या या सेवा यज्ञाबद्दल सन्मान करण्यात आला आणि त्यांना जीवनावश्यक किराणा साहित्य भेट देण्यात आले.
‘‘लोकमत’’ ने सामाजिक बांधीलकीने काम करणाऱ्या तिकोने बंधूंच्या या कामाविषयी (दि.२७) च्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. भोई प्रतिष्ठानतर्फे या कुटुंबाला मदत करण्यात आली. या प्रसंगी हे तिघे ही खूप भावूक झाले होते. सामाजिक कार्यकर्ते राम आप्पा तारु, उदय नातू, दत्तात्रय घाग, मनोज खैरमोडे, श्रेयस खोपडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
.....
‘‘केवळ परमेश्वराची सेवा म्हणून आम्ही आमचा जीव धोक्यात घालून हे काम करत आहोत आणि याचे आम्हाला समाधान आहे.’’ - काळू राम तिकोने
.....