पुणे : चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमाविषयींचे प्रशिक्षण देण्याबरोबरच भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दर्जेदार कलाकारांची फळी निर्माण करणारे एक ‘कलात्मक व्यासपीठ’ अशी ओळख असलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ला सीईओ वर्ल्ड मॅगझिनच्या जगभरातील पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट कलात्मक इन्स्टिट्यूटच्या यादीत स्थान मिळाले आहे. पहिल्या दहामध्ये समाविष्ट झालेली ‘एफटीआयआय’ ही आशियातील एकमेव इन्स्टिट्यूट ठरल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामध्ये कोलकत्त्याची सत्यजित रे टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ही २२ व्या स्थानावर आहे. सीईओ वर्ल्ड ने जगभरातील कलात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूटची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिल्या चार स्थानांवर अमेरिकेतील कलात्मक संस्थांनी बाजी मारली आहे. ‘यूसी स्कूल ऑफ सिनेमँटिक आर्टस ’, ‘अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट (एएफआय), ’यूएलसीए स्कूल ऑफ थिएटर, फिल्म अँंड टेलिव्हिजन युनिव्हर्सिटी ऑफ कँलिफोर्निया व ‘कँलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ द आर्टस’ यांचा समावेश आहे. याशिवाय पाचव्या स्थानावर ब्रिटनची ’नँशनल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूल’, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर पुन्हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क फिल्म अँकँडमी आणि एनवाययू टिस्च स्कूल ऑफ द आर्टस यांना स्थान मिळाले आहे. कँनडातील ’’टोरांटो फिल्म स्कूल’ आठव्या, ऑस्ट्रेलियातील ‘सिडनी फिल्म स्कूल’ नवव्या आणि भारतातील फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) दहाव्या स्थानावर आहे. एफटीआयआय ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे. या संस्थेने नसरुद्दीन शाह, ओम पुरी, जया बच्चन, विधु विनोद चोप्रा अनेक कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीला दिले. संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची दखल ही जगभरातील विविध महोत्सवांमध्ये घेण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर संस्थेतील विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले आहे.
पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा : दहा सर्वोत्कृष्ट कलात्मक इन्स्टिट्यूटमध्ये ‘एफटीआयआय’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 5:25 PM
एफटीआयआय ही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे.
ठळक मुद्देसीईओ वर्ल्ड मॅगझिनच्या यादीत मिळविले स्थान