पुणे : मुंबई शेअर बाजाराच्या गगनचुंबी इमारतीभोवती फिरणारे शेअरचे भाव पाहण्यासाठी दररोज गुंतवणूकदार, एजंट यांची मोठी गर्दी असते़ मान वर करून ते इमारतीवर लावलेल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक फलकावर येणारे विविध कंपन्यांचे भाव पाहत असतात़ आशिया खंडातील एक प्रमुख शेअर बाजार असणाऱ्या शेअर बाजाराची घंटा वाजविण्याचा मान काही मोजक्या व्यक्तींनाच मिळतो़ सोमवारी हा मान मिळाला होता, तो बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल राऊत हिला़ आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त एक दिवस कॅनडाची दूत म्हणून काम करण्याचा आणि मुंबई शेअर बाजाराची घंटा वाजविण्याचा मान तिला देण्यात आला होता़ कॅनडाचा मुंबईतील दूतावास आणि राज्यातील स्वयंसेवी संस्थांकडून मुलींचे शिक्षण, विकास यासाठी काही प्रकल्प राबविले जातात़ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे गेलेल्या, मुलींचे प्रश्न समजून ते मांडू शकणाऱ्या एखाद्या मुलीला एक दिवस कॅनडाची दूत म्हणून काम करण्याची संधी देण्यात येते़ आंतरराष्ट्रीय कन्यादिनी ११ आॅक्टोबरला साजरा करण्यात येतो़ त्यानिमित्ताने कोमल राऊत हिला ही संधी देण्यात आली होती़ पुणे महापालिकेच्या के़ सी़ ठाकरे विद्या निकेतन या शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेली कोमल आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी होत असते़ (प्रतिनिधी)
पुण्याच्या तरुणीचा बहुमान
By admin | Published: October 11, 2016 2:11 AM