पुणे : ‘पीएमपीएल’ने प्रवास करणाऱ्या महापौर प्रशांत जगताप यांची स्टंटबाज म्हणून सर्वसाधारण सभेत हेटाळणी करणाऱ्यांची महापौर प्रशांत जगताप यांनी पदांचा मान ठेवायला शिका, अशा शब्दांत कानउघाडणी केली. ‘पीएमपीएल’ मधील अनेक सुविधांची सुरुवात आपण संचालक असताना केली होती व त्याचे अनुकरण अन्य महापालिकांमधील प्रवासी सेवांनी केले, असा दाखलाही त्यांनी दिला.‘पीएमपीएल’च्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणींची माहिती करून घेण्यासाठी महापौर जगताप यांनी शनिवारी वानवडी ते महापालिका असा प्रवास ‘पीएमपीएल’ने केला. त्यादरम्यान त्यांनी प्रवाशांबरोबर संवाद साधला व त्यांच्या अडचणींची माहिती करून घेतली. रविवारी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ‘महापौर स्टंटबाजी बंद करा’ अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही भाजपाच्या नगरसेवकांनी त्याचीच री ओढत महापौरांवर टीका केली. ‘स्टटंबाजी करणाऱ्या महापौरांचा निषेध असो’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. कचऱ्याच्या विषयावर स्वपक्षाचे शहराध्यक्ष टीका करीत असताना महापौर मात्र प्रवासाची स्टंटबाजी करीत आहेत, असे ते म्हणाले. भाजपाचे गणेश बिडकर, मुक्ता टिळक, वर्षा तापकीर आदींनी ‘महिलांसाठी राखीव असलेल्या आसनांवर महापौर बसलेच कसे’ असा सवाल केला. भाजपाच्या या टीकेची पूर्वकल्पना असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश बापट असाच ‘पीएमपीएल’ने महिलांच्या आसनांवर बसून प्रवास करीत असलेले छायाचित्र मोठे करून सभागृहात आणले होते. ते दाखविण्यास त्यांनी सुरुवात केली. सभागृह नेते बंडू केमसे यांनी स्टंटबाजीचे दुसरे नावच भाजपा असल्याची टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मंत्री पंकजा मुंडे यांच्या सेल्फीपर्यंतचे अनेक दाखले त्यांनी त्यासाठी दिले. भाजपाचे सदस्य त्या वेळी त्यांच्या बोलण्यात वारंवार अडथळे आणत होते. (प्रतिनिधी)
पदांचा मान ठेवा; महापौरांची विनंती
By admin | Published: November 08, 2016 1:46 AM