लोणी काळभोर :पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी ८ हजार ८४८ मीटर उंची असलेले जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट एव्हरेस्टला गवसणी घातली. शिवाजी ननवरे हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आहेत. महाराष्ट्र पोलीस खात्यातील पुणे ग्रामीण दलात ते पोलीस उपनिरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत.
गिर्यारोहणाची आवड असल्याने त्यांनी गुरुवारी (दि.१८) माऊंट एवरेस्ट शिखर सर करून पराक्रम करून दाखविला आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्राची रणरागिणी सुविधा राजेंद्र कडलग यांची एवरेस्ट मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांची निवड करण्यात आली होती.
माउंट एव्हरेस्ट शिखर हे चढाईस अत्यंत कठीण असे पर्वतशिखर आहे. पण हार मानलं तो माणुस कसला, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या सहाय्याने शिवाजी ननवरे यांनी माऊंट एवरेस्ट शिखरावर तिरंगा झेंडा रोवला. याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे म्हणाले की, 'गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य करत असताना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. ती आवड कर्तव्य बजावीत असताना व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली आहे. माऊंट एवरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता असणे अत्यावश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे नॉर्मल चालताना देखील दमछाक होते. परंतु, जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स नेहमी यशस्वी होतात.'