पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील राज्याच्या पोलीस वायरलेस विभागाचे संचालक व अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर पोलीस दलातील इतर ८ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने पोलीस सेवेतील उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी 'राष्ट्रपती पदक'ची घोषणा केली जाते. यंदा पुण्यातील १० जणांना हे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
पुणे पोलीस दलातील परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपअधिक्षक अनिल पाथरुडकर, रेल्वेच्या पुणे विभागातील पोलिस उपअधिक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील यादव व राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ ग्रुप एक) असिस्टंट कमांडंट सादिकअली सय्यद व अरविंद आल्हाट ( पोलीस निरीक्षक, बिनतारी विभाग) यांना गुणवत्ता पूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे......