या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. प्रामाणिक कष्ट म्हणजेच गुणवत्ता होय. गुणवत्ता ही श्रीमंतांची जहागिरी नसून परिश्रमातून गुणवत्ता तयार होत असते. दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण संपादन करून राज्य पातळीवरील यश संपादन केले आहे. तालुक्यातील कल्याणी तुकाराम माने हिने दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक आणि उत्कर्ष योगेश शिंदे याने बारावीच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील गुणवत्ता सिद्ध केली आहे. दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर आपले नाव उज्ज्वल केले आहे.
यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध जपण्याचे काम करीत समाजासाठी कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श सातत्याने डोळ्यांसमोर ठेवून आपली वाटचाल करावी. खडतर परिस्थितीमध्ये यश प्राप्त करण्यास महत्त्व असते तसेच यशामध्ये शिक्षक अर्थात गुरूला महत्त्व असल्याचे या वेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या वेळी भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, सर्व प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले, तर आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.
१४ इंदापूर
इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सन्मान करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.