धनकवडी : जगभरात ८ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून जागतिक महिला दिन साजरा करत असताना महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे, असे मत सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांनी व्यक्त केले.
आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव झाला. यावेळी तावरे बोलत होत्या.
महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढण्यासाठी समविचारी महिलांनी एकत्र येऊन ३६ महिलांना सन्मानित केले.
यावेळी सहआयुक्त रुबल अग्रवाल व महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या वेळी उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के, तहसीलदार अर्चना निकम, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, ॲड. दिलीप जगताप उपस्थित होते.
राजीव जगताप म्हणाले, महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा जागतिक महिला दिवसाचा मुख्य उद्देश असून, आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे.
यावेळी मुख्याध्यापिका वर्षा शर्मा, सचिव सुनीता जगताप, निर्मोही जगताप, सचिन कोळी, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पुण्यप्रभा सासवडे, वाहतूक शाखेच्या अनिता शिर्के, कर्तव्यनिष्ठ महिला मंचच्या सदस्या, शिक्षक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. दिलीप जगताप यांनी केले तर आभार दीपा देशपांडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले होते.