लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरस्वती सन्मान पुरस्कारप्राप्त शरणकुमार लिंबाळे आणि यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आबा महाजन यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पारितोषिक विजेते डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. दिलीपराज प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवारी (दि.२७) एरंडवण्यातील मनोहर मंगल कार्यालयात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे असतील, तर अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार उपस्थित राहणार आहेत. यंदापासून ज्येष्ठ ग्रंथ वितरकाचा सन्मान केला जाणार असून, पहिला दिलीपराज सुवर्ण स्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार अमरावतीचे ग्रंथ वितरक नंदकिशोर बजाज यांना प्रदान केला जाणार आहे. यावेळी काही पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे. दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांनी ही माहिती दिली.