पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून पैसे वसूल केल्याप्रकरणी नाना पेठेतील गुंड सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरला समर्थ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आंदेकर याच्यासह त्याचा साथीदार सागर थोपटे (दोघे रा. नाना पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौरव सिद्धू सारवाड (वय २४, रा. संभाजीनगर, धनकवडी) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाना पेठेतील नागझरी नाल्याजवळ बाबा लतीफ शहा दादापीर दर्गाच्या मोकळ्या जागेत मासळी बाजारात मासळी घेऊन येणारी वाहने लावली जातात. आंदेकर आणि त्याच्या साथीदाराने तेथे अनधिकृत वाहनतळ सुरू केले. त्यांनी पावती पुस्तक छापून घेतले. मोकळ्या जागेत वाहने लावणाऱ्या मासळी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या चालकांकडून त्यांनी पैसे वसूल केले. या भागात दररोज साडेतीनशे ते चारशे वाहने लावण्यात येतात. वाहनचालकांना धमकावून दररोज साडेतीन ते चार हजार रुपये खंडणी स्वरुपात उकळण्यात आले. दरमहा बेकायदा वाहनतळातून एक लाख रुपये आंदेकर आणि साथीदार उकळत होते, असे सारवाड याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, व्यापारी पेठेत दहशत तसेच एका तरूणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
आंदेकर याला गुरुवारी (दि. ८) अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. आंदेकर याच्यावर दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपी हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून, त्याने मिळालेल्या पैशांचे काय केले? या गुन्ह्यात आणखी कुणी आरोपी आहे का? याचा तपास करायचा असल्याने सरकारी वकील किरण बेंडभर यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करीत न्यायालयाने आंदेकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.
-------------------------------------------------------------------------------------