धनकवडी : शनिनगर परिसरामध्ये हातात पालगन घेऊन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांना बघून पळून जात असताना त्याला पाठलाग करुन पकडले. संबंधीत गुन्हेगार तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आला होता. कृष्णा बबन लोखंडे (वय १९, रा. शनिनगर, आंबेगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांचे गस्ती पथक कात्रज परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिस कर्मचारी सर्फराज देशमुख व गणेश शेंडे यांना एक खबर मिळाली. एक व्यक्ती हातात पालगन घेऊन शनिनगर येथे दहशत निर्माण करत आहे. खबर मिळताच गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कृष्णा हा हातात पालगन घेऊन दुकानदारांवर भाईगिरी करताना आढळला. तो दुकानदारांना दहशतीने दुकाने बंद करण्यास सांगत होता. पोलिसांना बघताच तो पळून जाऊ लागला. मात्र, गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले. त्याच्या हातातील पालगन काढून घेतल्यावर त्यांची अंगझडती घेतली असता पँन्टच्या खिशात खोवलेले एक पिस्तूल, चार काडतूसे सापडली. त्याला पोलिस ठाण्यात आणून त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्याला पुणे शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार केल्याचे समजले. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणी तडीपारीचा भंग आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस हवालदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, विक्रम सावंत, राहुल तांबे यांनी ही कारवाई केली.