पिंपरी: एका तरुणीमुळे दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्या दोन गटांनी बेकायदेशीर जमाव करून चिंचवड पोलिस ठाण्यासमोर हाणामारी केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
अजित संतोष कांबळे (वय २५), सचिन भिकाजी ताकपिरे (वय ३५), सनी नागेश वाघमारे (वय २१), साहिल व्यंकटेश वर्मा (वय १९), विकी नागेश वाघमारे (वय २०, सर्व रा. काळेवाडी), शोएब इरशाद शेख (वय १९, रा. पिंपरी), पंकज सुहास पाटील (वय १८), संदीप रामचंद्र घोडके (वय ३७, दोन्ही रा. चिंचवड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सागर धनंजय कांबळे (वय १८), अलका धनंजय कांबळे (वय ३७), कुसुम भिकाजी ताकपिरे (वय ५५, तिघेही रा. काळेवाडी), सुधा सुहास पाटील (वय ४२, रा. चिंचवड) तसेच एक अल्पवयीन मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मुरलीधर नरवडे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक तरूणीशी बोलण्यासाठी आल्याच्या कारणावरून राग मनात धरून वाद झाला होता. त्यावरून दोन गटात चिंचवड पोलीस ठाण्यासमोर हाणामारी झाली. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमा केला. त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.