लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाल्यानतंर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. अनेक नेते एक-मेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. यातच आता, अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमक्या देत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर केला आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, "तीन प्रकारचा दबाव आहे. ग्रामिण भागात बघितलं तर, जे लाभार्थी आहेत, त्यांना मलिदा गँग म्हणतात. ते तेथे असलेल्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगत आहेत की, तुम्ही साहेबांचा अथवा ताईंचा प्रचार करायचं धाडस करायचं नाही. जर तसं केलं, तर उद्या जाऊन तुम्हाला अनेक अडचणी सोसाव्या लागतील. दुसरा दबदबा, पीडीसीसी बँक, त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला लोन दिलं जाईल, नाही दिलं जाईल, असा धमकीचा प्रचारही तेथे केला जातोय. पुणे शिक्षण मंडळ, तेथे असलेले जे शिक्षक आहेत, त्यांना धमकी दिली जात आहे की, तुम्ही प्रचार करा. नाही तर तुमची बदली करतो."
"तिसऱ्या प्रकारची धमकी, गुंडांच्या माध्यमातून शहरी भागात दिली जात आहे. काही गुंडांना यादी दिली गेली आहे. जे सुप्रिया ताईंचा प्रचार करतात, त्यांना गुंड फोन करतात आणि म्हणतात, या भागात शांतपणे राहायचे असेल, तर अजित दादांचा प्रचार करा, नाही तर आम्ही तुम्हाला बघतो," असा आरोपही रोहित पवार यांनी केला. एवढेच नाही, तर "हे तिन्ही चारी प्रकार या परिसरासाठी नवीन आहेत. पण दूर्दैवं असे की, अजित दादांचे जे काही पदाधीकारी आहेत, या सर्व गोष्टींचा वापर करत आहेत. दडपशाही वाढण्याचा. पण ही गोष्ट सामान्य नागरिकांना आवडत नाही. आमचे असे मत आहे की, हे जेवढं वाढवतील, तेवढंच सुप्रिया ताईंचं लीड वाढेल," असेही रोहित म्हणाले.