पुणे : राज्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
कुचिक म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या मोहिमेत केंद्र व राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांचा व गटप्रवर्तकांचा सक्तीने समावेश करून घेतला आहे. हेच काम करणारे आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना त्यासाठी दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जातो, आशा कर्मचाऱ्यांना मात्र अत्यल्प मानधनावर राबवून घेतले जात आहे हे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे.
आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य आयुक्त यांच्याबरोबर यासंदर्भात वेळोवेळी बैठका झाल्या, मात्र अजूनही आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना आजपर्यंत योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या योजनांचा लाभ मिळाला नाही. हे त्यांचे शोषणच आहे, त्यामुळे आता तुम्हीच यात लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केल्याचे कुचिक यांनी सांगितले.