जेजुरी : जेजुरी शहरामध्ये गेल्या ११ वर्षांपासून निराधार ‘आशा’ला सांभाळणाऱ्या परमसिंह थापा यांच्या मदतीसाठी समाजातील अनेक मान्यवर पुढे सरसावले आहेत. आशाला उच्च शिक्षण देऊन तिच्या पायावर उभी करण्याचे थापा यांचे स्वप्न समाजातील अनेक मदतीच्या हातांनी पूर्ण होणार आहे. त्यामुळे अनाथ आशा आणि तिच्या माता -पित्याची भूमिका बजावणाऱ्या ‘साथी’ ऊर्फ परमसिंह थापा यांची पुढील भवितव्याची चिंता दूर होण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा सासवडचे माजी नगराध्यक्ष आर. एन. जगताप यांनी जेजुरीत येऊन परमसिंह थापा व त्यांची मुलगी आशा हिची कार्यकर्त्यांसमवेत भेट घेत तिला ५ हजार रुपयांची मदत केली. तसेच पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली. तर भूमाता महिला ब्रिगेडच्या प्रदेश सचिव परवीन पानसरे यांनी आशाच्या नावे १५ हजार रुपयांची फिक्स डिपॉझीट करण्याची तयारी दर्शवली असून १२ वी पर्यंतच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी ही घेण्याचे ठरवले आहे. मूळचे आसाम येथील एका पहाडी खेडेगावातील परमसिंह थापा हे गेल्या ४२ वर्षांपासून जेजुरी शहर व बाजारपेठेमध्ये रात्रीची गस्त घालून स्वत:चा व निराधार मुलीचा उदरनिर्वाह करतात. सुमारे ११ वर्षांपूर्वी त्यांना जेजुरी बसस्थानक आवारात बेवारस स्थितीमध्ये चार महिन्यांची मुलगी आढळून आली होती. ही बेवारस मुलगी त्यांनी घरी आणून आपल्या मुलीप्रमाणेच तिचा सांभाळ करीत स्वत:चे नाव लावत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. या ११ वर्षांत अनेक अडचणी आणि संकटे आली. मुलगी एक वर्षाची असताना थापा यांच्या पत्नीचे अल्पश: आजाराने निधन झाले. रात्रीची गस्त घालून व्यावसायिक व्यापारी व ग्रामस्थांनी दिलेल्या बक्षिसीतून आपला आणि मुलीचा उदरनिर्वाह करताना परमसिंह थापा यांनी मुलीला सांभाळण्याची जिद्द सोडली नाही. सध्या थापा यांचे वय ७५ असल्याने वयोमानानुसार त्यांना स्वत:चा व आशाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसारित झाल्यानंतर समाजातील अनेक मान्यवरांचे हात दोघांच्या मदतीला सरसावले आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे यांचे दीर व मुळशी तालुक्यातील बावधन येथील उद्योजक रमेश दगडे व त्यांच्या पत्नीने मदत देऊ केली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते व कै. सरस्वती लोणकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान ऊर्फ भाऊ लोणकर यांनी आशाच्या शिक्षणासाठी दरमहा ३०० रुपयांची मदत व दसरा-दिवाळीला नवीन कपडे देण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या अलका शिंदे यांनी ही आशाला स्थानिक पातळीवर सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवले आहे. वर्तमानपत्रातील बातमीमुळे परमसिंह थापा यांचे सत्कर्म व त्याग परोपकार समाजासमोर आल्याचे आर. एन. जगताप, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, शिवाजी खोकले यांनी बोलून दाखवले. (वार्ताहर)
‘आशा’च्या उच्च शिक्षणाचे ‘थापां’चे स्वप्न पूर्ण होणार?
By admin | Published: April 17, 2017 6:35 AM