पिंपरी : आलिशान मोटर कार फिरायला देणे बंद केल्याने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना बौद्धनगर परिसरात घडली. या प्रकरणी चौंघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पंकज संभाजी माने (वय २६), आशिष कांबळे (वय २४), गोपाळ तळेकर (वय २५), अमर गौतम चिकटे (वय २५, सर्व रा. बौद्धनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. महेंद्र नामदेव गायकवाड (वय ३२, रा.बौद्धनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी रविवारी (दि.२१) रात्री बौद्धनगर येथील गुरुबळ बंगल्याशेजारील रस्त्याने रात्री साडेदहाच्या सुमारास पायी चालले होते. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्याला गाठले. फिर्यादींच्याकडे असलेली आलिशान मोटरकार फिरायला देणे बंद केल्याच्या रागातून त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. तू आम्हाला कार का देत नाहीस. तुला कसला माज आला आहे. तुला माहित नाही का, आम्ही कोण आहे ते, असे म्हणत चिकटे आणि माने यांनी फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तळेकर याने पँटमधून लोखंडी फायटर काढून डोक्यात मारले. तर, कांबळे याने पाठीमागून डोक्यात दोन वार करुन गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.