हाॅस्पिटलकडून अद्यापही रुग्णांची फसवणूक सुरूच : अजित पवार यांचे यंत्रणेला कडक कारवाई आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 06:09 PM2020-09-25T18:09:27+5:302020-09-25T18:12:28+5:30
जादा बिल घेणाऱ्या व महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करा
पुणे : शहरासह ग्रामीण भागात देखील आजही खाजगी हाॅस्पिटलकडून कोरोना रुग्णांची पिळवणूक केली जाते. बिल तपासण्यासाठी समिती नियुक्त केली असली तरी बिल दिल्याशिवाय डिस्चार्ज दिला जात नाही, महात्मा फुले योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांकडून सर्व कागदपत्रे घेऊन लाभ दिला जात नाही आणि शासनाकडून पैसे वसूल करतात अशा अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या. यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अद्याप ही खाजगी हाॅस्पिटलकडून रुग्णांची फसवणूक सुरूच आहे. यामध्ये जादा बिल घेणाऱ्या व महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश प्रशासनाला दिले.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनिल शेळके, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे, या मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल, त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.
------
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत " पोस्ट कोविड रुग्णांचा सर्वेक्षण "
पुण्यास संपूर्ण राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना नंतर इतर अनेक त्रास होत असून, अनेक जणांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यास लवकरच सर्वत्र पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील, तसेच राज्यात सध्या " माझे कुटुंब माझी जबाबदारी " या मोहिमेच्या पुढील टप्प्यात पोस्ट कोविड रुग्णांचे देखील सर्वेक्षण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.
-------
औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा
शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाच्या औषधांचा काळाबाजर सुरू आहे. पुण्याला दररोज सरासरी दहा हजार रेमडेसिव्हिर लागत असताना सध्या चार, साडे चार हजाराच उपलब्ध होतात. सर्वसामान्य नागरिकांना तर ही औषधे, इंजेक्शन मिळतच नसल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या. यावर माझ्यासह पक्षाचे नेते शरद पवार साहेब यांचे देखील यावर बारीक लक्ष आहे. सध्या सरसकट या औषधांचा वापर सुरू आहे. याबाबत देखील आता शासनाने नियम घालून दिले आहेत तसेच औषधांचाही काळाबाजार करणा-यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.