पुणे : शहराच्या पश्चिम भागात ससून रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने मोठे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. कमला नेहरू रुग्णालयाचाही विस्तार करण्यात येत असून त्याशिवाय नायडू रुग्णालयाला जोडूनच वैद्यकीय महाविद्यालयही सुरू करण्यात येत आहे. तसेच दोन मोठी रोगनिदान केंद्रही लवकरच सुरू करण्यात येत आहेत.महापालिकेची आरोग्य सुविधा सुसज्ज करण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अंदाजपत्रकात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करून त्यासाठी आर्थिक तरतुदही केली होती. त्याप्रमाणे आता त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तत्पूर्वी महापालिकेची दोन मोठी रूग्णालये सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी एक पश्चिम पुण्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ एकर जागा हवी आहे. त्यासंदर्भात मोहोळ यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता शिवाजी लंके, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांच्याबरोबर बैठक घेतली.पुण्याच्या पश्चिम भागात अशी एक जागा असल्याचे मोहोळ यांनी अधिकाºयांच्या लक्षात आणून दिले. त्या जागेची पाहणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नायडू रुग्णालय तसेच कमला नेहरू रुग्णालयांचा विस्तार करण्यात येणार आहे. ही दोन्ह रुग्णालये महापालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात येतील, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. रुग्णांना चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी हा विभाग अद्ययावत करण्याला स्थायी समितीने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजित महाविद्यालयाची सरकारी परवानगी तसेच अन्य अत्यावश्यक कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.येत्या महिनाभरात महापालिकेची दोन रोगनिदान केंद्र सुरू होतील. त्यात हृदयतपासणीपासून सर्व प्रकारच्या अत्यावश्यक तपासण्या माफक शुल्क आकारून करण्यात येतील. वय ६० च्या पुढील सर्व ज्येष्ठांसाठी या तपासण्या पूर्ण विनामूल्य करण्यात येणार आहेत. खासगी संस्थेच्या माध्यमातून ही दोन्ही केंद्र चालवण्यात येतील. कोथरूड येथील सुतार दवाखाना तसेच कमला नेहरू रुग्णालय अशा दोन ठिकाणी ही केंद्र असतील. त्याचे सर्व प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. खासगी संस्थांमध्ये अशा प्रकारच्या तपासण्यांसाठी भरमसाठ शुल्क आकारले जाते, गरीब रुग्णांना ते परवडत नाही, म्हणून महापालिका ही केंद्र सुरू करत आहे.
ससूनच्या धर्तीवर पश्चिम पुण्यात उभारणार रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयही विचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 4:37 PM
महापालिकेची आरोग्य सुविधा सुसज्ज करण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराच्या पश्चिम भागात ससून रुग्णालयाच्या धर्तीवर मोठे रुग्णालय बांधण्यात येणार आहे.
ठळक मुद्देयेत्या महिनाभरात महापालिकेची दोन रोगनिदान केंद्र सुरू होतील.खासगी संस्थेच्या माध्यमातून ही दोन्ही केंद्र चालवण्यात येतील.वय ६० च्या पुढील सर्व ज्येष्ठांसाठी तपासण्या पूर्ण विनामूल्य करण्यात येणार.