पुणे : शहरामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. पुण्यात शुक्रवारी (दि. २६) कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला होता. आजही उन्हाचा कडाका जाणवत असून, दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दुसरीकडे राज्यामध्ये वादळी पाऊस सुरू असून, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात आज (दि. २७) कोकणामध्ये उष्ण व दमट हवामान आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. सध्या मराठवाड्यापासून ते तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान पहायला मिळत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड, धाराशीव, लातूर, तसेच नगर, सोलापूर आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात किमान तापमानातही वाढ झाली आहे. वडगावशेरी २९.२, मगरपट्टा २८.३, हडपसर २७.३, कोरेगाव पार्क २७.२ आणि शिवाजीनगरमध्ये २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.