आरोपीला हैद्राबादमधून जेरबंद : अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुणे : पत्नीने तिच्या पतीचे कपडे धुण्यासाठी पँटच्या खिशात हात घातला, तेव्हा त्यात पुण्यातील रास्ता पेठेतील हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची पावती मिळाली. संशयावरुन तिने भावाला खात्री करायला सांगितले, त्यातून त्यानेच मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. समर्थ पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून जाऊन जेरबंद केले आहे.
महमंद रुबान महमंद मसूद (वय २६, रा. बंडला गुडा, हैदराबाद) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या महिलेची बहीण, तिचे पती समवेत हैदराबाद येथे राहते. या महिलेची १७ वर्षाची मुलगी १८ ते २१ रोजी घरातून बेपत्ता झाली. तिचा शोध सर्व जण घेत होते. पीडितेच्या आईने हैदराबादेतील बहिणीला फोन केला. तेव्हा बहिणीचा पती महमंद मसूद याने त्याला मुलीचा फोन आला होता व तिने “मै घर छोडकर भाग गयी हूं और मरने जा रही हूं” असे म्हणल्याचे सांगितले.
तेव्हा मुलीच्या आईने तिच्याकडे फोन नाही, तर तिने तुम्हाला फोन कसा केला असे विचारले. तेव्हा त्याने तिचा शोध घेऊन कळवितो, असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर तो स्वत: १९ मे रोजी तिला तिच्या मुंब्रा येथील घरी घेऊन गेला व त्याने ती डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ मिळाल्याचे सांगितले आणि तिला घरी सोडले व तो परत हैदराबाद येथे घरी निघून गेला. त्यानुसार सुमारे ५ दिवसांनी त्याचे कपडे धुण्यासाठी त्याच्या पत्नीने घेतले. तेव्हा पँटच्या खिशात त्यांना पुण्यातील हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची पावती मिळाली. तिने तिच्या भावाला खात्री करण्यास सांगितले. त्याने संबंधित हॉटेलला फोन करुन खात्री केली असता महमंद मसूद हा त्याच्या पत्नीसोबत मुक्कामी राहिला असल्याचे समजले. त्यांनी प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहिले तेव्हा त्यात मसूदबरोबर पत्नी नाही तर पीडित मुलगी असल्याचे आढळले.
त्यानंतर तिच्या आई व नातेवाईकांनी विचारपूस केल्यावर तिने काकाने तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केल्याची व कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो समर्थ पोलिसांकडे वर्ग केला. सहायक फौजदार अर्जुन दिवेकर, पोलीस शिपाई निलेश साबळे, निलेश किरणे हे हैदराबादला गेले. पण तो घरी सापडला नाही. फोटोच्या आधारे ते शोध घेत असताना चंद्रयानगुट्टा भागात त्यांना तो दिसला. त्याला हटकल्यावर तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन पकडून गुरुवारी पुण्यात आणले. गुरुवारी सकाळी त्याला अटक करुन न्यायालयात नेले. न्यायालयाने अधिक तपासासाठी २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे, अर्जुन दिवेकर, निलेश साबळे, निलेश किरवे, शांताराम तळपे, शुभम देसाई यांनी ही कामगिरी केली.