पुणे : हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलाची रक्कम स्वतःच्या खात्यावर घेऊन खोटे सेल रिपोर्ट दाखवून हॉटेल मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभिजित तुळशीराम कदम यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
अधिक माहितीनुसार अमोल मोहन राज (रा. वानवडी) हा संगमवाडी परिसरात असलेल्या हॉटेल क्वालिटी येथे मॅनेजर पदावर कामाला होता. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलाची रक्कम तो स्वतःच्या खात्यावर घेत होता. तब्बल ९ लाख ३ हजार रुपये त्याने स्वतःच्या खात्यावर घेऊन फसवणूक केली. ही बाब हॉटेल मालकाच्या लक्षात आल्यावर अमोलने खोटे सेल रिपोर्ट सादर केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अभिजित कदम यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अमोल मोहन राज याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कदम करत आहेत.