पुणे : कुटुंबासमवेत गोव्याला फिरायला जाण्याचा विचार त्यांनी केला. त्यासाठी हॉटेल बुकिंग करण्यासाठी त्यांनी हॉटेलचे सर्च करून त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडले. चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ९४ हजार ७०० रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी पर्वती येथे राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे कुटुंबासह गोव्याला फिरायला जाण्याचा बेत आखत होते. त्यासाठी गोव्यातील कॅरावेला बीच रिसॉर्ट हॉटेल यांनी गुगलवर शोधले. या हॉटेलच्या बुकिंग करीता कॅरावेला बीच रिसॉर्टच्या होम पेजवरील मोबाइल क्रमांकावर फिर्यादी यांनी फोन केला. तो नंबर नेमका सायबर चोरट्यांचा निघाला. त्या फोनवर सक्सेना असे नाव सांगणाऱ्याने त्यांना हॉटेल बुकिंग साठी २५ हजार रुपये अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी त्या खात्यावर २५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर बुकिंग रिसीट जनरेट करण्यासाठी गुगल पे ट्रान्झेक्शन फिचरचा वापर करून त्यावर त्यांना रिसीट नं. ३९८५० व २९८५० असे बुकिंग आयडी टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर त्यांच्या खात्यातून ३९ हजार ८५० रुपये व २९८५० रुपये कट झाले. अशा प्रकारे एकूण ९४ हजार ७०० रुपयांची त्यांची फसवणूक झाली असून पोलीस निरीक्षक विजय खोमणे तपास करीत आहेत.