पुणे : हॉटेलचालकाला दुचाकीस पाठीमागून धडक देत ते खाली कोसळल्यानंतर त्यांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करीत ८० लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच कुटुंबीयांना कॉल करून खडीमशीन चौक येथे बोलावून घेत ६ लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस हवेली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आदित्य रोहिदास साळुंखे (वय २४, रा. साई सोनाई कॉम्प्लेक्स, शिंदे पूल, शिवणे) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी सागर सुनील शिरवाळे (वय ३१, नांदेड फाटा), महेश ऊर्फ बबल्या तानाजी नलावडे (वय २५, रा. निगडे, ता. वेल्हे) आणि गजानन विलास मोरे (वय २६ , रा. नऱ्हे ) यांना अटक केलेली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी उदय शेट्टी (वय ४३ रा. वडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खडकवासला गावच्या हद्दीत डी.आय.ए.टी. प्रवेशव्दाराजवळ तसेच कोंढवा खडीमशीन चौक येथे ३० आणि ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ही घटना घडली होती.
याप्रकरणात तपास करून जानेवारी २०२१ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपी आदित्य साळुंखे हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे दोन वर्षांपासून फरार होता. या काळात त्याने कोेठे वास्तव्य केले. खंडणीच्या गुन्ह्यांत आरोपी आदित्य याला दीड लाख रुपये वाटणी मिळाली आहे ती त्याच्याकडून हस्तगत करणे व गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.