पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्य विक्री प्रकरणात हाॅटेल मालकासह व्यवस्थापकाला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी दिले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात 'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, पद्मविलास पॅलेस, वानवडी) व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन, तुकाईनगर, हडपसर), हॉटेल ‘ब्लॅक' चे असिस्टंट मँनेजर संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. पद्मावती हाईटस्, केशवनगर, मुंढवा) यांना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य विक्री प्रकरणी तिघांवर् गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, याप्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ॲड. विद्या विभुते आणि ॲड. योगेश कदम यांनी युक्तिवादात केली. आरोपींच्या वतीने ॲड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली. अपघात आणि मद्य विक्री प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. दोन गुन्हे वेगळे आहेत. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती ॲड. जैन यांनी युक्तिवादात केली. सामाजिक कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत बाजू मांडली. भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. कल्याणीनगर अपघात गंभीर गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही आरोपींना दि. 24 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
न्यायालयाने सुनावले
कल्याणीनगर अपघात गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला. मुलाला मद्य विक्री प्रकरणी हाॅटेलमालकासह व्यवस्थापाकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटना वेगळ्या आहेत, स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. मुळात हे प्रकरण गंभीर आहे. अपघातात दोघांचे बळी गेले आहेत. पब, हाॅटेलमध्ये खातरजमा न करता मुलांना मद्य विक्री करण्यात असल्याचे उघडकीस आले आहे. पब, हाॅटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या गोंधळाच्या तक्रारी आल्या आहेत. मद्य पिऊन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने निष्पांपाचे बळी गेले, अशा शब्दांत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावले.