पुणे: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचे (Vaishali Restaurant Pune) मालक जगन्नाथ शेट्टी (Jagannath Shetty) यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील डेक्कन येथील प्रयाग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जगन्नाथ शेट्टी यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे.
१९४९ साली जगन्नाथ शेट्टी कर्नाटकातून पुण्यात आले आणि हॉटेल वैशालीमध्ये काम सुरू केलं होतं. पुढे जाऊन ते हॉटेल वैशालीचे मालक बनले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर असलेले हॉटेल वैशाली त्यांना नावारुपाला आणलं. जगन्नाथ शेट्टी यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९३२ साली कर्नाटकातील ओणिमजालू नावाच्या एका छोट्याशा गावात झाला होता. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी कर्नाटक सोडून काकांसोबत कल्याण येथे आले होते. दरमहा अवघ्या तीन रुपयांच्या पगारावर त्यांनी नोकरीला सुरूवात केली होती. त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी ते पुण्यात आले आणि वैशाली हॉटेलमध्ये काम करू लागले होते. हॉटेल आपलं स्वत:चं असल्यासारखं ते मेहनत घेऊन काम करत होते. पहाटेपाहून ते रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये सर्व कामं ते पाहात असत.
वैशाली हॉटेल नावारुपाला आणण्यास जगन्नाथ शेट्टी यांचा मोलाचा वाटा आहे. अनेक पुरस्कारांनी हॉटेल वैशालीला गौरविण्यात आलं आहे. तसंच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी यांचं हॉटेल वैशाली आवडीचं ठिकाण बनलं आहे. आजही हॉटेल वैशालीमध्ये पोटभर जेवणासाठी ग्राहक रांगा लावून उभे असतात.