धायरी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे एमपीडीए कायद्यांतर्गत शिक्षा भोगून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करीत आजुबाजुच्या व्यावसायिकांनाही धमकावले आहे. हि घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. तुषार उर्फ सोन्या कोळप्पा धोत्रे (वय:२३ वर्षे, रा. जयप्रकाश नारायण नगर, नांदेड, पुणे) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथील साईबा चहा येथे रात्री आठ वाजण्याच्या सोन्या धोत्रे हा दारू पिऊन आला. त्यानंतर त्याने तिथे असलेल्या कर्मचाऱ्याला विनाकारण मारहाण करीत हॉटेलची तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या व्यावसायिकांना देखील त्याने धमकावले. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोन्या धोत्रे हा सराईत गुन्हेगार असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समजते. तो मागील महिन्यातच तुरूंगातून बाहेर आला असल्याची माहिती मिळते आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली.
विनाकारण घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण....
विनाकारण एखाद्याला मारहाण करायची अथवा दुकानांतील सामानांची तोडफोड करून दहशत पसरवायची म्हणजे कमी कालावधीत 'भाई ' बनण्याचा हा मार्ग बरेच तरुण करताना दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र ह्या गोष्टीचा विनाकारण त्रास होत आहे. किरकटवाडी येथील घडलेली घटना ही अशाच प्रकारची असल्याचे समजते. या भागातील नागरिक हे भीतीच्या छायेत असून सोन्या धोत्रे याच्याविरुद्ध येथील नागरिक तक्रार करण्यास पुढेही येत नाहीत. वर्चस्व दाखविण्याच्या उद्देशाने गाड्यांची अथवा दुकानांतील सामानांची तोडफोड करण्याचे प्रकार वाढले आहेत. छोट्या गोष्टींना पाठबळ मिळाले की आत्मविश्वास आणि धैर्य वाढते व त्यातून 'गुंड' बनण्याकडे वाटचाल सुरु होते. आणि मग गुन्हे घडतात, पोलिसांनी वेळीच अशा 'भाई' होऊ पाहणाऱ्या तरुणांना आवर घालणे गरजेचे आहे.