पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी खासगी व सरकारी रुग्णालयात बेड मिळण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे.ऑक्सिजन बेड, आणि व्हेंटिलेटरचा तर फार मोठी कमतरता भासत आहे.याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात एक आशादायक चित्र निर्माण झाले असून कोरोना बाधितांच्या उपचारासाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आता हॉटेल, रिसॉर्ट पुढे येत आहे. पुण्यातील सूस रस्त्यावरील सनीज् वर्ल्ड या रिसॉर्ट येथे शासनाने जम्बो कोविड सेंटर सुरू करावी, अशी विनंतीची साद प्रशासनाला घातली आहे.
पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यात मार्च महिन्यात तर कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. कोविड काळात सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.मात्र,तरीदेखील आजमितीला कोरोना रुग्णांना उपचारासाठी सहज बेड उपलब्ध होताना दिसत नाही.त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था,संघटना यांच्यासह हॉटेल, रिसॉर्ट क्षेत्रातील लोक देखील कोरोनाकाळात मदतीसाठी पुढे सरसावले आहे. आपल्या व्यवसायाची जागा कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. तर काही हॉटेलने अन्न पाण्याची व्यवस्था करत माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. सनीज् वर्ल्ड पुण्यात प्रसिद्ध आहे.त्यांनी पण शहरातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याची गंभीर दखल घेत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
'सनीज् वर्ल्ड रिसॉर्ट' चे संचालक विनायक निम्हण म्हणाले,कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र, अद्यापही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.त्यामुळे सनीज वर्ल्ड मध्ये १८००० स्क्वेअर फुटाचे दोन प्रशस्त हॉल, अनेक रूम, कॉटेजेस पाणी, वीज,पंखे स्वच्छता गृह बाथरूम, यांसारख्या सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. याठिकाणी शासनाचे कोविड सेंटर उभे करण्यास आम्ही उत्सुक आहोत. कोरोना रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण मोफत देण्याची देखील आम्ही व्यवस्था करण्यास तयार आहोत.फक्त आवश्यक ती वैद्यकीय उपचार यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस यांचा स्टाफ पुरवण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. लवकरात लवकर प्रशासनाने जागेची पाहणी करून कोविड सेंटर तातडीने सुरु करावे.
पुण्यात अशाप्रकारे रिसॉर्ट देखील कोविड संकटात योगदान देण्यासाठी पुढे येत आहे ही सकारात्मक बाब आहे.