पुणे : दुपारी चारच्या सुमारास सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये माेठ्याप्रमाणावर पाणी साचले. नळस्टाॅपजवळील म्हात्रे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला हाेता. तर या भागातील अनेक वाहने पाण्याखाली गेली.
विजांच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या तासाभरात शहरात तब्बल 43. 3 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. पावसाचा जाेर इतका हाेता की वाहनचालकांना समाेरचे दिसणे अवघड जात हाेते. काही मिनिटांमध्येच रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. प्रभात रस्ता, डिपी रस्ता, नळस्टाॅप, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता या ठिकाणी रस्त्यावरुन पाण्याचे लाेट वाहत हाेते. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना देखील घडल्या. सखल भागातील अनेक साेसायट्यांमध्ये पाणी साचले हाेते. तासाभरानंतर पावसाच्या जाेर कमी झाला.
25 सप्टेंबर राेजी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला हाेता. वीसहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले हाेते. त्यामुळे आजच्या पावसाचा जाेर पाहता नागरिकांना त्या दिवसाची आठवण झाली. तासाभरात शहरात 43. 3 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. कात्रज येथे 42 , काेथरुड येथे 53 तर वारजे येथे 48 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला हाेता. संध्याकाळी शहरातील अनेक भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. तर काही ठिकाणच्या सिग्नल यंत्रेणेत बिघाड झाला हाेता. दरम्यान उद्या देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.