पिंपरी : महिलांचे अपहरण झाले, की त्या बेपत्ता झाल्या? काय झाले असेल तिघींचे? अशी काळजीजनक चर्चा ७ दिवसांपासून होती. मोबाईलही बंद असल्याने नातेवाइकांसह पोलिसांचीही चिंता वाढली होती. मात्र नातेवाइकांना दिलासा देत पोलिसांनी तिघींचा छडा लावला. हिंजवडी आयटी पार्कच्या फेज २ जवळील ओझरकरवाडीतून २८ नोव्हेंबर रोजी प्रतिभा हजारे, मंगला इंगळे आणि विद्या खाडे या तिघीजणी घराबाहेर पडल्या; त्या परतल्याच नाहीत. एकाच ठिकाणच्या अन सुजाण असलेल्या तिघीजणी अचानक बेपत्ता होण्याची शहर परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने एकच खळबळ उडाली. महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्रकाश हजारे यांनी दिली. त्यावरून गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सीआयडीनेही या प्रकरणी लक्ष घातले आणि कुटुंबीयांना विश्वासात घेऊन तपास तडीस लावला. पुण्यातील हिंजवडी, माण परिसरातील स्व. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरी (आयटी पार्क) सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशिल आहे. आयटीपार्क परिसरात महिलांचे अपहरण, अत्याचार आणि खूनाच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे येथे विशेषत: महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जाते. या घटनांचा विचार करता तिघींचेही अपहरण झाले काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याने पोलिसांची झोप उडाली. या महिलांचे काय झाले असेल, याचीच चर्चा परिसरातील घराघरांमध्ये, तसेच आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्येही सुरू होती. एकीकडे त्यांंच्याविषयी काळजी तर दुसरीकडे भीती असल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत होती. त्या सुखरूप परत येतील अशी आशाही अनेकांना होती. येथील परिस्थितीची जाणीव नसणाऱ्या या महिलांचा माग काढताना अखेर त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर केलेल्या संपर्कावरून पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. त्या नोकरीच्या शोधात भुसावळ येथे गेल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)
घराघरांतील जीव पडला भांड्यात
By admin | Published: December 06, 2014 4:01 AM