पांडुरंग मरगजे
धनकवडी : 'हौसेला मोल नसते' ही म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे. परंतु 'हौसेला वय नसतं' हे धनकवडी, बालाजीनगर मधील धुमाळ कुटुंबातील पंजोबा ह. भ. प. नाथोबा यादवराव धुमाळ यांनी सिद्ध केलं आहे. के.के. मार्केट परिसरात राहणाऱ्या राजेंद्र धुमाळ यांच्या घरी गौरी गणपतीसाठी बागायत शेतावरल्या झोपडीचा आकर्षक देखावे साकारला असून त्यामध्ये गौरी गणपती बसवले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे राजेंद्र धुमाळ यांचे वडील हभप नाथोबा धुमाळ यांनी नातवंडांच्या मदतीने हा देखावा साकारला आहे.
धुमाळ यांचे मूळ गाव भोर जोगवाडी. त्यांच्या घरी सुमारे पन्नास साठ वर्षांपासून गणपती बसवण्याची परंपरा आहे. राजेंद्र धुमाळ यांचे वडील नाथोबा यांचे वय ९० वर्षे आहे. ते लहानपणापासून स्वतः च्या हाताने मातीचा गणपती करून बसवायचे.
यंदा त्यांनी पुण्यातल्या घरी नातसुन व १३ वर्षाच्या पणतीच्या मदतीने बागायत शेतावरील झोपडीचा आकर्षक देखावा साकारला आहे. त्यामध्ये सुंदर पारंपारिक वेशात सजलेल्या गौरी, मध्ये गणपती, हिरवेकंच शेत, बैलजोडी, गुरांचा गोठा, गवताची झोपडी, पारंपारिक स्वयंपाक घर व घरासमोर तुळशीवृंदावन साकारले. गौरीपुढे लाडु करंजी चकलीसह मांडलेले फराळाचे पदार्थ समृद्ध कृषी संस्कृतीची आठवण करून देणारे ठरले.
हभप नाथोबा धुमाळ यांना तीन मुले, तीन सुना, सहा नातवंडे, दोन नात सुना, तीन नात जावई,आठ पणतू असा २५ जणांचा मोठा परिवार आहे. नव्वदीच्या वयातही ते नातवंडे- पतवंडांसह मोठ्या उत्साहाने गौरी गणपतीचा सण साजरा करतात.