बारामती : अंधार दूर सारून प्रकशाची दिशा दाखवणारा सण म्हणजे दिवाळी. आश्विन शुद्ध द्वादशी म्हणजेच वसुबारसपासून या सणाला प्रारंभ होतो, कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीजेला सांगता होते. बुधवारी (दि. ११) लक्ष्मीपूजनासाठी बारामती बाजारपेठेत विविध आकारातील आकर्षक लक्ष्मी मूर्ती विक्रीस आल्या आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत दर वाढल्याचे विके्रत्यांनी सांगितले. दारिद्य्ररूपी अंधार दूर सारून सुख, समृद्धीचा प्रकाश आणण्यासाठी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन कृष्ण अमावास्या हा दिवस लक्ष्मीपूजन म्हणून साजरा होतो. मात्र दुष्काळामुळे यंदा दिवाळी सणावर मंदीचे सावट आहे. भारतीय संस्कृतीत लक्ष्मी ही समृद्धी-संपदेची देवता मानली जाते. दारिद्य्र-अवदसा दूर होण्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी कुबेर यांची पूजा केली जाते. सामान्यत: लक्ष्मीपूजन सायंकाळी वा रात्रीच्या वेळी करण्याची प्रथा आहे. त्यानिमित्ताने घरोघरी लक्ष्मी मूर्तीची खरेदी होते. शहरातील बाजारात खास दिवाळी साहित्याची रेलचेल वाढली आहे. शहरातील भाजीमंडई, भिगवण चौक, महावीर पथ, गुणवडी चौक, आदी ठिकाणी दिवाळी साहित्याचा बाजार सजला आहे. त्यामध्ये लक्ष्मी मूर्ती विक्रीस आल्या आहेत. बारामतीसह परिसरातील ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला दुकाने सजवली आहेत. (वार्ताहर)
घरोघरी आज होणार लक्ष्मी-कुबेराचे पूजन
By admin | Published: November 11, 2015 1:29 AM