घोडेगाव : डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आंबेगावातील शिल्लक क्षेत्र व घरांचा समावेश बोरघर ग्रामपंचायतीमध्ये व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून या शिल्लक घरांमध्ये राहणाऱ्या कातकरी कुटुंबाची आहे. मात्र, अजूनही या कुटुंबांची नोंद बोरघर ग्रामपंचायत दप्तरी होत नसल्याने येथील ४१ कातकरी कुटुंबांनी दि. २ आॅक्टोबरला डिंभे धरणात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आंबेगाव (जुना) गावचे उर्वरित क्षेत्र व घरेही बोरघर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी २ आॅक्टोबर २०१७ रोजी येथील कातकरी लोकांनी आंदोलन केले होते. यावेळी संबंधित अधिकाºयांनी सहा महिन्यांत घरकुलांची नोंद करून कातकरी बांधवांना नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त पुणे यांनी बोरघर ग्रामपंचायतीमध्ये ही कुटुंबे समाविष्ट करावीत, म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अजूनही यावर कोणताच निर्णय झालेला नाही.
सध्या या क्षेत्रात ४१ कातकरी कुटुंबे राहत आहेत. यातील २२ कुटुंबांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत संस्थेने घरकुल बांधून दिली आहेत. उर्वरित १९ कुटुंबे अजूनही नदीच्या काठी राहून जीवन जगत आहेत. ज्या २२ कुटुंबांना घरकुल बांधून देण्यात आली आहेत, त्यांच्या घरांची नोंददेखील बोरघर ग्रामपंचायत दप्तरी झालेली नसल्याने त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचे आदिवासी एकजूट संघटनेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.त्यामुळे या कातकरी कुटुंबास लाईट, पाणी व इतर कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नाहीत. एवढेच काय, तर जन्म-मृत्यूची नोंद करता येत नाही. डिंभे धरणाच्या पुनर्वसनापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनाच्या लाल फितीच्या कारभारात गोरगरीब कातकरी लोक अजूनही विकासापासून वंचित राहिले आहेत.