लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तब्बल दहा टक्के व्याजाने दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी एका महिलेला मारहाण करून तिचे घर आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचा बेकायदा ताबा घेण्यात आल्याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता. आयेशा गनी खान (वय ५८), तिचा मुलगा अब्दुल खान, अक्रम पठाण, अक्षय माने, अक्षय नाईक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लता अभिमान ताटे (वय ३८, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताटे या धुण्याभांड्याची कामे करतात. आरोपी आयेशा हिचा पैसे व्याजाने देण्याचा बेकायदा व्यवसाय आहे. ताटे यांनी आयेशा हिच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. आयेशा हिने त्यावर दरमहा दहा टक्के व्याज आकारले होते. ताटे यांनी तिला वेळोवेळी ७० हजार रुपये दिले. मात्र, ही रक्कम घेऊनही आरोपींनी ताटे यांच्याकडे आणखी १ लाख २३ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम द्यावी म्हणून ताटे व त्यांच्या मुलीला वेळोवेळी मारहाण केली. मुलीला घेऊन जाण्याची धमकी दिली. ताटे यांचे घोरपडे पेठेतील घर बळजबरीने बळकावून ताब्यात घेतले. तसेच त्यांचे आधार कार्ड, निवडणूक कार्ड, रेशनकार्ड आणि विम्याची मूळ कागदपत्रे व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.
सावकाराने महिलेचे बळकाविले घर
By admin | Published: July 05, 2017 3:37 AM