लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाºया प्रवाशांमुळे शहरातून जाणा-या सर्व एसटी बसेस रविवारी हाऊसफुल होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येत असून त्याही भरून जात आहेत. त्यामुळे आरक्षण न केलेल्या गावी जाण्याचा बेत एक दिवस पुढे ढकलावा लागल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, एसटी महामंडळाने पुणे विभागात उपलब्ध करून दिलेल्या १३३८ गाड्यांचे आरक्षण फुल झाले.राज्याच्या विविध भागांतून शिक्षण, नोकरी तसेच व्यवसायासाठी शहरात आलेल्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. सण-उत्सवाच्या काळात हे नागरिक कुटुंबासह आवर्जून गावी जातात. प्रामुख्याने दिवाळी सणासाठी गावी जाणाºयांची संख्या मोठी असते. यातील अनेक जण प्रवासासाठी एसटी बसला प्राधान्य देतात. त्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी लागल्यानंतर लगेचच बसेसला गर्दी होण्यास सुरुवात होते.शहरातील अनेक शाळांना शुक्रवारपासूनच दिवाळीची सुट्टी सुरू झाल्याने शनिवारी गाड्यांना मोठी गर्दी झाली होती. हीच स्थिती रविवारीही कायम राहिली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातर्फे १४ ते १८ आॅक्टोबर दरम्यान १३३८ गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्यांचे शंभर टक्के आरक्षण झाले आहे. तसेच नियमित धावणाºया गाड्याही गर्दीने तुंडुब भरून धावत आहेत. रविवारी सर्व बसस्थानके गर्दीने फुलून गेली होती. त्यामुळे आरक्षणाशिवाय ऐन वेळी आलेल्या अनेक प्रवाशांना बस उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी काहींना गावी जाण्याचा बेत एक दिवस पुढे ढकलावा लागला.दिवाळीसाठी २ हजार ६५८ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १३३८ गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध होत्या. उर्वरित १ हजार ३२० गाड्या ऐन वेळी आरक्षणाविना प्रवास करणाºया प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, अभियांत्रिकी व कृषी महाविद्यालयांची मैदाने या ठिकाणाहून बस सोडल्या जात आहेत.प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, हिंगोली तसेच नागपूर, अमरावती, वाशिम, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नंदूरबार, धुळे,कोकण, नाशिक, औरंगाबाद अशा सर्वच मार्गांवर जाणाºया गाड्यांना तुडुंब गर्दी आहे.एसटीला गर्दी असल्याने अनेक प्रवाशांनी खासगी बसेसला पसंती दिली. त्यामुळे या बसेसलाही गर्दी झाली होती. परिणामी काही खासगी बसेसचे तिकीटदर आवाक्याच्या बाहेर गेल्याचे प्रवाशांनी सांगितले.
एसटीला गर्दी असल्याने अनेक प्रवाशांनी खासगी बसेसला पसंती दिली. त्यामुळे या बसेसलाही गर्दी झाली होती. परिणामी काही खासगी बसेसचे तिकीटदर आवाक्याच्या बाहेर गेल्याचे प्रवाशांनी सांगितले.