पुणे : घरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण देऊन तो कचरा वेचकांकडे सुपूर्त करण्याची सवय नागरिकांना लागावी. या उद्देशाने पुणे महापालिकेने सोमवारपासून घरगुती सुका कचरा एका दिवसाआड गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान घरगुती ओला कचरा मात्र दररोज उचलण्यात येणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना आता सुका कचरा दोन दिवस घरातच ठेवावा लागणार असून, कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दंडही भरावा लागणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, यासाठी ओला कचरा दररोज तर सुका कचरा दिवसाआड उचलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. यापुढे ओला व सुका कचरा वेगळा न करता मिश्र कचरा देणाऱ्या नागरिकांना पहिल्या वेळी ६० रुपये, दुसऱ्या वेळी १२० रुपये व त्या पुढील प्रत्येक वेळेस १८० रुपये दंड आकारण्यात येणार असून, त्या अनुंगाने वॉर्ड ऑफिस स्तरावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार नागरिकांनी घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला, सुका व जैविक कचरा वेगळा करून देणे बंधनकारक आहे. मात्र, वारंवार सूचना करून नागरिक हा सर्व कचरा एकत्रच देतात़ परिणामी हा सर्व कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यामुळे घरगुती कचऱ्याचे घरातच वर्गीकरण व्हावे, या हेतूने महापालिकेने ओला कचरा दररोज, तर सुका कचरा एक दिवसाआड संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, वॉर्ड ऑफिसनिहाय कचरा संकलनाचे वेळापत्रक तयार केले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख माधव जगताप यांनी दिली......मोठया सोसायट्यांना आठ दिवसांची मुदत शहरात दररोज शंभर किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, तसेच पन्नास पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्था, रूग्णालये, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, हॉटेल्स-रेस्टॉरन्ट यांनी ओला कचरा आपल्याच परिसरात प्रक्रिया करून जिरविणे बंधनकारक आहे. मात्र अद्यापही अनेक आस्थापनांनी याबाबत कार्यवाही केलेली नाही किंवा प्रक्रिया प्रकल्पही उभारलेले नाहीत. त्यामुळे अशा सर्व आस्थापनांना महापालिकेने पुढील आठ दिवसात प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सूचना केली असून, त्यानंतर तेथील ओला कचरा उचलण्यात येणार नसल्याचेही सांगितले आहे.
पुणेकरांनो, घरगुती सुका कचरा आता दिवसाआड जमा केला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:08 PM
कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दंडही भरावा लागणार
ठळक मुद्देघरगुती ओला कचरा मात्र दररोज उचलण्यात येणार कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण सवय नागरिकांना लागावी हा हेतू