लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : नव्या माळीणमध्ये बांधलेली घरे संपुर्णत: भुकंपरोधक आहेत त्यामुळे घरांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी माळीण भेटीत ग्रामस्थांना दिली. माळीण पुनर्वसन गावात पहिल्याच पावसात भरावे खचून झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव माळीण मध्ये आले होते. यावेळी कॉलेज आॅफ इंजिनीअरींगचे प्राध्यापक भालचंद्र बिराजदार, वास्तुविशारद योगेश राठी, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, सी. टी. नाईक, एस. बी. देवढे, विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभीयंता एस. बी. खांडेकर, तहसीलदार रविंद्र सबनिस, नायब तहसीलदार विजय केंगले इत्यादी अधिकारी, पदाधिकारी माळीण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.राव म्हणाले, माळीणकरणांच्या सुरक्षेसाठी प्रशासन संवेदनशील आहे, पहिल्या पावसात काही बिघाड झाली असेल ती तत्काळ दुरूस्त केली जाईल. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार होणे सहाजिक आहे परंतु घाबरून जावू नका तुमची सुरक्षा ठेवणे आमचे कर्तव्य आहे. येथून स्थलांतरीत होणे हा काही उपाय नाही, पावसाळयात येथे सतत लक्ष ठेवून येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तत्काळ दुरूस्ती केली जाईल. तसेच २ एप्रिल रोजी झालेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर माळीणला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. पिण्याच्या पाण्याची योजना निष्फळ ठरली. पाईपलाईन ना दुरूस्त झाल्या, साठवण टाकी गळत आहे. अशा काही समस्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ग्रामस्थांना धीर दिला व येथेच रहा कोणत्याही प्रकारे घाबरण्याचे कारण नाही प्रशासनकडे सुरक्षेची पूर्ण जबाबदारी आहे असा विश्वास व्यक्त केला. तसेच घरांमध्ये पाण्याची गळती होत असेल तर तत्काळ दुरूस्त्या केल्या जातील. तसेच माळीणच्या ग्रामस्थांमधून दक्षता समिती तयार करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात साचलेले पाणी बाहेर काढणे, खचलेला भराव करून घेणे आदी समस्या दूर केल्या जातील.
माळीणमधील घरे पूर्णत: सुरक्षित
By admin | Published: June 28, 2017 4:00 AM