पुणे : पालिकेच्या कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या सानेगुरुजी वसाहतीच्या पुनर्विकासाच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या वसाहतीमधील घरे मालकी हक्काने देण्याची मागणी रहिवाशांनी केली. शनिवारी सानेगुरुजीनगर मनपा वसाहत बचाव कृती समितीचे सदस्य असलेले शेकडो रहिवासी पालिकेमध्ये जमा झाले होते. पालिका आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले.
सानेगुरुजी नगर वसाहतीमध्ये एकूण सतरा चाळी असून, ४५३ कुटुंबं याठिकाणी राहतात. ही वसाहत ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहे. आहे त्या जागेवर मालकी हक्काची घरे देण्याची मागणी येथील रहिवासी मागील २५ ते ३० वर्षांपासून करीत आहेत. याच वसाहतीमधील पालिका सेवकांच्या सायंतारा आणि ओमशांती या दोन इमारतींना मान्यता देण्यात आली असून तेथे घेण्यात आलेले ४५ सभासद हे या वसाहतीमधील रहिवासी नाहीत. रहिवाशांच्या विरोधामुळे यापूर्वी तीन वेळा आणलेला बीओटीचा प्रस्ताव रद्द करण्यात आलेला आहे. एसआरएच्या माध्यमातून झोपडीधारकांना घरे दिली जात आहेत. मग, पालिका सेवकांना घरे देण्यास विरोध का होतो आहे, असा प्रश्न रहिवाशांनी विचारला. १५ डिसेंबर २०२० च्या स्थायी समितीत सानेगुरुजी नगर वसाहतीत नवी शंभर घरे उभारणीसाठी १८ कोटी रुपयांना मंजुरी दिली. रहिवाशांचा या प्रस्तावाला विरोध असून आम्ही राहत असलेल्या इमारतींना सहकारी सोसायटी म्हणून मान्यता देऊन मालकी हक्काची घरे द्यावीत, अशी मागणी माजी नगरसेवक धनंजय जाधव, गणेश सातपुते, महेश महाले, वामन क्षीरसागर, शाम ढावरे, अरुण थोरात आदींनी केली आहे.