पांडुरंग मरगजेपुणे (धनकवडी) : चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता.एक गृहिणी ते नँशनल चँम्पियनशिप आणि २०२० च्या विश्वस्तरीय स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व हा प्रवास सर्वसामान्य गृहिणींना निश्चितच प्रेरणादायी आहे. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चिकाटी, दृढनिश्चय आणि सातत्याने केलेल्या सरावाच्या जोरावर निता मेहता यांनी कझाकिस्तान येथे झालेल्या एशियन गेम्स् वुमन्स पाँवरलिफ्टींग चँम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत २०२० मध्ये होणाऱ्या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे. निता या पुण्यातील सारसबाग परिसरात राहात असून, सातारा रस्ता परिसरातील नामांकित संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. . निता यांनी वयाच्या तिशीनंतर उत्तम आरोग्यासाठी दृढनिश्चय करून व्यायामाला सुरुवात केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतः चे आरोग्य उत्तम असावे म्हणून फावल्या वेळात त्या व्यायाम करु लागल्या. मात्र अगदी कमी कालावधीमध्येच त्यांच्या मधील स्पिरिट आणि कौशल्य प्रशिक्षक ओंकार नेलेकर यांनी हेरले आणि निता यांनी पाँवरलिफ्टींगमध्ये करिअर म्हणून सराव करण्याचा सल्ला दिला.त्यांनी लगेच सरावाला सुरुवात केली. योग्य आहार, व्यायामाचे नियोजन, सातत्य आणि कठोर मेहनत करीत निता यांनी पाँवरलिफिटंगमध्ये चँम्पियनशिप बनण्याचे स्वप्न पाहिले. आणि ते पुर्ण केले. स्टेट, नँशनल आणि आशियन गेम्स चँम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या निता यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. निता यांनी आपल्या गटामध्ये स्काटमध्ये शंभर किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले, बेंचप्रेस मध्ये ४७.५ किलो वजन उचलत सिल्व्हर पदक मिळविले तर डेटलेफ्ट मध्ये ११५ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. याबाबत त्या म्हणाल्या की, 'कोणत्याही वयात ध्येय गाठणं कठीण नाही, फक्त त्यासाठी लागते ती जिद्द. सुरुवातीला मलाही पॉवरलिफ्टिंग अवघड वाटत होतं, पण प्रयत्न केल्यावर त्यात रस निर्माण झाला. हा अतिशय चांगला क्रीडाप्रकार आहे, यात अजून महिलांनीही सहभागी व्हावं असं मला वाटतं'.
गृहिणी ते नॅशनल चॅम्पियन ; तिचा थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 8:20 PM