पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी महापालिकेला सुट्टी असतानाही आत १०० लोकं कशी आली; पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
सोमय्यांवर झालेला हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे की या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. पुणे पोलिसांनी तकलादू कलमं लावली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
''किरीट सोमय्यांनी आजपर्यंत अनेक आरोप केले आणि ते सिद्धही झाले परंतु त्यांच्यावर हल्ला झाला नाही. याचाच अर्थ असा की, यावेळेस अशा एका व्यक्तीवर आरोप झाले ज्याला ते सहन झाले नाही. त्यामुळेच केंद्राची सुरक्षा असतानाही सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असून पोलीस याबाबत गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देण्यात आले आहेत. आता लवकरच हल्ला करणाऱ्यांना समोर आणण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.''
किरीट सोमय्या पुन्हा पुण्यात येणार
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये किरीटजी सोमय्या यांना दुखापत झाली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या अध्यक्षतेखाली पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यावेळी केली त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून ११ फेब्रुवारीला महापालिकेच्या त्याच पायरीवर सोमय्यांचे जंगी स्वागत करणार असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले होते. त्यामुळे किरीट सोमय्या पुन्हा पुण्यात आल्यावर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.