पुणे : दोन वर्षांत कृषी कर्जापैकी सुमारे ६५ टक्के कर्ज वितरण शहरातील बँकांमधून झाले आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा फारसा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शहरी बँकामधून कृषी कर्जाखाली नक्की कोणाला फायदा मिळाला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या कर्जप्रकरणांची छाननी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.देशातील ६१५ कॉर्पोरेट कंपन्यांनी २०१६-१७ मधे तब्बल ५८ हजार कोटी रुपयांचे कृषी कर्ज लाटल्याचे समोर आले आहे. याच आर्थिक वर्षात महानगरांतील बँक शाखांमधून ६५ हजार ६११ कोटी रुपये, शहरी भागातील बँकांच्या शाखांतून १ लाख ७ हजार ११२ कोटी रुपये व निमशहरी बँक शाखांमधून २ लाख ८० हजार १५३ कोटी वाटण्यात आले. त्या तुलनेत ग्रामीण भागातील बँक शाखांमधून २ लाख ३९ हजार १३२ कोटी रुपये कृषी कर्जाचे वितरण झाले.
शहरी बँकांतून कृषी कर्जाचे अधिक वाटप कसे -शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 5:56 AM