बारामती : माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी पवार यांनी सातव यांच्याकडे बारामतीकर कसे आहेत, असा पहिला प्रश्न विचारत बारामतीच्या कोविड परिस्थितीची माहिती घेतली.
पवार यांच्यावर मागील महिन्यात दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ते सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक भागातील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. या दरम्यान, सातव यांनी घेतलेल्या भेटीत त्यांनी बारामतीकरांची आस्थेने चौकशी केली. शहरातील सातव कोविड हॉस्पिटलची अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेतल्याचे सांगत सातव कुटुंबीयांकडून महालक्ष्मी उद्योग समूह व डॉ. सुनील पवार यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष सातव यांनी सातव शाळा, कसबा याठिकाणी सर्वोत्तम कोविड हॉस्पिटल व कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड हॉस्पिटलची जबाबदारी गटनेते सचिन सातव, ‘माळेगाव’ चे संचालक नितीन सातव व नगरसेवक सूरज सातव पार पाडत आहेत. हॉस्पिटलमधून आतापर्यंत २०० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता (दि. १२) रोजी प्रभाग १० माळेगाव कॉलनी येथील प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरू केल्याचे गटनेते सातव यांनी सांगितले.
बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
२००५२०२१ बारामती—०१