पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे श्रेय महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्याांनी महापालिका प्रशासनाने राबविलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेमुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले आहेत. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाले नसते तरच नवल. काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देत श्रेयवादाच्या लढाईत काँग्रेसने उडी घेतली आहे.
पुण्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मार्च, एप्रिल आणि मे च्या सुरुवातीपर्यंत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा वेग प्रशासन आणि पुणेकरांमध्ये धडकी भरविणारा होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट आढळून आली आहे. परंतू,आता यावरून श्रेयवादाचा नवीन वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
तिवारी म्हणाले, पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे ही बाब जरी खरी असली तरी त्याचे संपूर्ण श्रेय फक्त महापालिकेचे नसून राज्य सरकार, प्रशासन आणि प्रत्येक पुणेकराने दाखविलेल्या संयमामुळे हे शक्य होत आहे. त्यामुळे या घटकांना देखील कोरोना लाट कमी होण्याचं श्रेय निश्चितच द्यावे लागेल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत महापालिकेसह प्रत्येक नागरिकाने आपलं योगदान दिले आहे. काहींच्या कुटुंबावर तर जवळची व्यक्ती गमावल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत फक्त महापालिकेला श्रेय दिले गेले तर ते इतर घटकांचा अपमानित केल्यासारखे होईल.
पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यावर गोपाळ तिवारी म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊन निर्बंध कमी करून दुकाने उघडण्याची मागणी होणे साहजिक आहे. मुळात पुणे आणि मुंबई हे उद्योगधंद्यांच्या दृष्टीने महत्वाची शहरे आहे. राज्यातील बरेच आर्थिक गणित य दोन शहरांवर अवलंबून आहे. त्यामुळे इथले उद्योग सुरू झाले होणे गरजेचे आहे. मात्र, उद्योग धंद्यांना परवानगी देताना संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे असे मत तिवारी यांनी व्यक्त केले. तसेच लॉकडाऊन संबंधीचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेईल असेही यावेळी ते म्हणाले.
भाजप नेत्यांच्या आश्वासनांचं पुढं काय झालं?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोविड काळात पक्षाच्या वतीने 2000 खाटांचे उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते.. मात्र ते आश्वासनाचं पुढे काय झालं? केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यासाठी व्हेंटिलेटर देणार होते, त्याचं काय झालं..? असाही सवाल तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला.