पुणे : निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता देशभरात लागू झाली. या आचारसंहितेच्या काळात आचारसंहितेच्या नियमांचा भंग हाेईल अशी कुठलिही गाेष्ट उमेदवारांकडून करायची नसते. परंतु अनेकदा या काळात आचारसंहितेचा भंग हाेत असताे. त्यासाठी आता निवडणुक आयाेगाने सी व्हिजील हे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिक देखील आचारसंहिता भंगच्या तक्रारी नाेंदवू शकणार आहेत.
आत्तापर्यंत देशभरात आचारसंहिता भंग झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात कुठल्याही सरकारी वाहनांचा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना वापर करता येत नाही. त्याचबराेबर कुठल्याही नवीन याेजना जाहीर करण्यात येत नाही. आक्षेपार्ह पाेस्टर्स, बॅनर लावता येत नाहीत. तसेच मतदारांना पैसे वाटणे, इतर प्रलाेभणे दाखवता येत नाहीत. यंदा पहिल्यांदाच निवडणुक आयाेगाकडून सी व्हिजील अॅप तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे सामान्य नागरिकांना देखील तक्रार दाखल करता येणार आहे. आचारसंहितेचा कुठे भंग हाेत असेल तर या अॅपवर नागरिक ते सांगणारा फाेटाे, व्हिडीओ आणि माहिती टाकू शकता. या तक्रारींची शहानिशा करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या असून त्यात पाेलिस, निवडणुक अधिकारी तसेच न्यायाधिशांचा देखील समावेश आहे. तक्रार मिळाल्यानंतर 15 मिनिटात ही टीम घटनास्थळी दाखल हाेते. घटनेची शहानिशा करुन 100 मिनिटांच्या आत केस निकाली काढायची असते.
दरम्यान या अॅपचा गैरवापर देखील नागरिकांकडून हाेताना दिसत आहे. काही नागरिक स्वतःचे फाेटाे या अॅपवर अपलाेड करत आहेत. त्याचबराेबर इतर ठिकाणांचे देखील फाेटाे अपलाेड करत आहेत. त्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडत आहे. विशेष म्हणजे या अॅपचा वापर करुन सर्वाधिक तक्रारी या पुणे मतदारसंघात नाेंदविण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर याेग्य ती कारवाई देखील करण्यात आली आहे. पुण्यात या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयात एका स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली असून तिथून निगराणी ठेवण्यात येत आहे.