पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर एका गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून निवडणूक निघते. ही बाब सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. अशा कोणत्याही स्वरूपात गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये. कारण त्यांचा आदर्श तरूण पिढी घेते. पोलिसांनी असे प्रकार अजिबात खपवून घेऊ नयेत. चोर आणि गुन्ह अनोखा गारांवर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस खात्याला सुनावले. ‘पोलीस म्हणजे गणवेशातले सरकार असते. पोलीस सामान्यांशी कसे वागतात यावर सरकार ठरते. त्यामुळे सामान्यांवर वचक न ठेवता त्यांच्या तक्रारींचे निवारण करायला हवे असेही ते म्हणाले.
घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यात चोरट्यांकडून पुणे पोलिसांनी जप्त केलेला ऐवज तसेच मुद्देमालाचे वाटप शुक्रवारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील तक्रारदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात पोलिसांनी ६० तक्रारदारांना एक कोटी २० लाख रुपयांच्या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले तसेच कोरोनाच्या संसर्गात मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांचा अनुकंपा तत्वावर पोलीस दलात समावेश करण्यात आला असून प्रातिनिधीक स्वरुपात त्यांना पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, डॉ. जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.
मध्यंतरी औंध भागात चोरांना पाहून पोलीस पळाल्याची ध्वनीचित्रफित पाहण्यात आली त्याचा दाखला देत पवार म्हणाले, या प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते आणि चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. पवार यांनी सामान्य नागरिकांनाही खडे बोल सुनावले. तुमचा एवढा माल चोरीला जातोच कसा? महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना भान ठेवावे. बाहेरगावी सहकुटुंब जाताना सोशल मीडियावर फोटो टाकले जातात. त्यातून चोरांचे अधिकच फावते. कृपया असे करू नका. हेच पोलिसांनी शोधून काढलेले दागिने घालून पुन्हा बाहेर जाणार आणि चोरट्यांकडून ते चोरीला जाणार. हे पुन्हा घडले तर चोरांना नाही तर तुम्हाला पकडणार.अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणे हे सर्वांचेच काम आहे असेही ते म्हणाले.-------------------------------------पुणे, मुंबईसह राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे बाधित झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाचा आढावा घेऊन कशी आखणी करायची यावर मार्ग काढणार आहोत. पुढील काळात काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत मी रविवारी (दि.21 ) जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.---