अतुल चिंचली
पुणे : राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा, यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या. राज्य सरकारने मुंबई या एकाच शहराला डोळ्यांसमोर ठेवून ही नियमावली जाहीर केली. स्थानिक प्रशासन आणि पुण्यातल्या मंडळांशी चर्चा करून ही नियमावली का निश्चित केली नाही, अशी नाराजी पुण्यातील गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे.
देश-विदेशात पुण्यातला गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळांचे मत लक्षात घेण्याची तसदी राज्य सरकारने का घेतली नाही, असा प्रश्न मंडळांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी गणेशोत्सवावर बंधने आली होती. पुण्यातल्या सर्वच मंडळांनी सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साधेपणानेच साजरा केला. पण तेव्हा प्रशासनाने मंडळांशी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला होता. यंदाही मंडळे सामंजस्याने वागणार आहेत. सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालनही करणार आहेत. पण स्थानिक पातळीवर चर्चा करण्यात सरकारला कमीपणा वाटण्याचे काय कारण, अशी भावना गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
---------------------
“नियमावलीत मूर्तींच्या उंचीबाबत घेतलेला निर्णय पुण्यासाठी लागू होत नाही. आत्ताच कोरोना आटोक्यात येत आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यावर आमचा भर असणार आहे, पण मंडळांशी चर्चा होणे गरजेचे होते. उत्सव जल्लोषात होणार नाहीच. पण त्यामध्ये मंडळाची मते जाणून घेता आली असती.”
-श्रीकांत शेटे, अध्यक्ष, मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे
-------------------------------------
“पहिल्या लाटेत मंडळांनी समाजासाठी सर्वतोपरी मदत केली. दुसऱ्या लाटेतही समाजकार्यात सक्रिय सहभाग आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नियोजन करणे गरजेचे आहे. राज्य शासनाचा निर्णय हा एका शहराला बघून घेण्यात आला आहे. त्यांनी मंडळांशी अथवा प्रशासनाशी चर्चा करून नियमावली जाहीर करावी. प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक भान ठेवूनच काम करतो. त्यामुळे सरकारच्या कुठल्याही निर्णयाचे आम्ही स्वागत करू.”
-महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे
---------------