कसा टळला पुण्यातला लॉकडाऊन?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 06:29 PM2021-03-26T18:29:05+5:302021-03-26T19:24:20+5:30
अजित पवारांचा बैठकीत थेट दोन गट. पोलीस होते लॉकडाऊन बाबत आग्रही तर इतर अधिकाऱ्यांचा लॉकडाऊन ला विरोध.
पुणे : पुण्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यात या आला. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी,दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान अधिकारी वर्गात थेट दोन गट पडले होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीत तातडीने लॉकडाऊन करावे अशी भूमिका घेतली होती. आजपासूनच लॉकडाऊन ची अंमलबजावणी करण्यात यावी अशी भूमिका घेतली होती.
काही अधिकारी वगळता बहुतांश आयएएस अधिकाऱ्यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला.लॉकडाऊन वरून बैठकीत थेट दोन गट पडले होते. अखेर तातडीने लॉकडाऊन करणे शक्य नाही अडचणीचे होऊ शकते अशी भूमिका मांडण्यात आली. लॉकडाऊन केला तर सर्वसामान्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होईल अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच ग्रामीण भागात लोक पॅनिक होऊन जायला लागले तर ग्रामीण भागात परिस्थिती बिघडेल असे देखील सांगण्यात आले. या चर्चेनंतर अखेर २ एप्रिलपर्यंत परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला उपस्थित आणि लॉकडाऊनला विरोध केलेले महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले " पोलीस यंत्रणेतील अधिकारी लॉकडाऊनच्या बाजूने होते. पण आपण आरोग्य यंत्रणा नीट करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अजून १२०० बेड महापालिकेच्या ताब्यात येणे अपेक्षित आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम केली आणि लसीकरण वाढवले तर एकूण परिस्थितीमध्ये फरक पडू शकेल. हे मुद्दे मांडून मी लॉकडाऊनला विरोध केला. सगळ्यांची मते ऐकून घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला"
अर्थात आत्ता लॉकडाऊन टाळला असला तरी जर ही परिस्थिती कायम राहिली तर २ तारखेचा बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात येईल असे देखील जाहीर करण्यात आले आहे.