पुणे : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यावरून या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेसला कसा धक्का बसला आहे, ते स्पष्ट होते आहे. राज्यातील सत्ता तर गेलीच, आता महापालिकेतूनही पायउतार व्हावे लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वाटचालीपुढे आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इतके होऊनही पक्षाचे स्थानिक नेते अजून ‘भाजपाच्या विजयाच्या भूकंपातही आम्ही आमचे फार नुकसान होऊ दिले नाही,’ असेच म्हणत आहेत. सलग १० वर्षांच्या सत्तेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला होता. त्यामुळेच सत्तेतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला धुडकावणे, त्यांच्या विरोधाला न जुमानता स्मार्ट सिटी, २४ तास पाणी योजना यासारख्या विषयांच्या मंजुरीसाठी विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाला साथीला घेणे असे बरेच प्रकार मागील ५ वर्षांत झाले. त्याचबरोबर स्वपक्षाच्याच शहराध्यक्षांच्याविरोधात आघाडी उघडणे, सभागृहात त्यांच्यावर निशाणा साधणे असेही अनेकदा घडले. त्याचा परिणाम म्हणून पक्षात अगदी उघडपणे दुफळी निर्माण झाली. सत्ता आहे म्हणून राष्ट्रवादीचे नेते हवे तसे वागतात, असे एक चित्र त्यामुळे पुणेकरांसमोर तयार झाले. उपनगरांमधील वर्चस्व कमी होत आहे, याकडे पक्षाचे लक्ष गेले नाही. नातेसंबंधावर आधारलेल्या मतदानावर राष्ट्रवादीचे सगळे नेते विसंबून राहिले. गेल्या काही वर्षांत या भागात अनेक सोसायट्या निर्माण झाल्या. तिथे राहणाऱ्या वर्गापैकी बहुसंख्य वर्ग हा मध्यपुण्यातून तिथे गेलेला आहे. त्यातील अनेक जण भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले. भाजपाला तिथे मुसंडी मारता आली ती गुणवत्तेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या निष्क्रियपणामुळे असे त्यामुळेच पक्षातच बोलले जात आहे. शहराच्या मध्यभागासाठी सत्तेच्या १० वर्षांत राष्ट्रवादीने काहीही केले नाही. दाखवता येईल, असे काम त्यांच्याकडून झाले नाही. त्याचाही परिणाम मतदानावर झाला. खऱ्या पुणेकरांकडे राष्ट्रवादीचे नेहमीच दुर्लक्ष झाले, अशी एक भावना पेठांमधल्या पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती. या भावनेला बळकटी येईल असेच वर्तन राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झाले. त्याचाही फटका बसला, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. (प्रतिनिधी) उपनगरांमधील वर्चस्वाला आव्हानभाजपाचे अगदी तरुण, नवखे चेहरे पॅनलमध्ये निवडून आले. त्यातील काहींनी तर राष्ट्रवादीच्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांना अस्मान दाखविले. संपूर्ण पॅनेल निवडून आणणार, असे हे नेते सांगत होते. त्यांच्या स्वत:च्याच निवडून येण्याची अडचण झाली, पॅनल तर दूरच राहिले. शहराच्या मध्यभागापासून ते राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, असे म्हटले जाणाऱ्या उपनगरांमध्येही भाजपाने मुसंडी मारली. मोठ्या नेत्यांच्या पॅनलमध्येही एक-दोन तरी चेहरे निवडून आलेच. पराभवाचे विश्लेषणही नाहीमावळत्या सभागृहात राष्ट्रवादीच्या ५५ जागा होत्या. आता ३८ आहेत. १७ जागांचा फटका त्यांना बसला आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पराभवाचे विश्लेषण मात्र इतकी मोठी लाट होती, तरीही आमचे फारसे नुकसान झालेच नाही, असे करण्यात येत आहे. त्यात थोडेफार तथ्य असले तरीही राष्ट्रवादीची यापुढची वाटचाल अशीच राहिली तर मात्र पक्षापुढचे प्रश्नचिन्ह मोठे झाल्याशिवाय राहणार नाही.
लाटेतही तगले कसेबसे
By admin | Published: February 26, 2017 3:51 AM