मुख्यमंत्री म्हणजे केवळ आनंद आणि सुखवस्तूच, किंवा मुख्यमंत्र्यांचं कुटुंब म्हणजेही आनंदी आणि कायम सुख-समृद्धी असाच समज सर्वसामान्यांचा असतो. मात्र, मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे एक मोठी जबाबदारी असते, हाच सूर लोकमत सखी डॉट. कॉमच्या कार्यक्रमात दिसून आला. लोकमत सखी डॉट कॉम पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल वैशालीताई विलासराव देशमुख यांना यावेळी 'सोशल इम्पॅक्ट' या पुरस्काराने गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, दै. एकमतच्या विश्वस्त अशा अनेक आघाड्यांवरील वैशालीताईंच्या कामचा गौरव या पुरस्कारातून करण्यात आला. दोघींनीही माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून असलेल्या जबाबदारीबद्दल स्पष्ट शब्दात आपलं मत मांडलं. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून वैशाली देशमुख आणि अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या आणि सदैव चर्चेत असलेल्या 'वर्षा' बंगल्यात राहण्याचा अनुभव घेतला आहे. हा अनुभव कसा होता, 'वर्षा'मध्ये राहणं किती अवघड असतं, किती प्रेशर असतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर दोघींनीही दिलेली उत्तरं मार्मिक होती.
'आम्हाला अवघड नाही, तर तिथं राहणाऱ्या व्यक्तीला ते अवघड आहे. आम्ही केवळ त्यांची साथ देतो. त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो,' असे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. त्यानंतर, अमृता फडणवीस यांनीही माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून आपलं मत व्यक्त केलं.
'नक्कीच मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून वेगळाच दबाव असतो, पण तुमच्यामुळे माझं जरा अवघड झालं. कारण, मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून आपण जो प्रोटोकॉल तयार केला. आपण जी वर्तणूक जपली, त्यामुळे मी थोडं जरी काही केलं तर ते लगेच तुलना केली जाते, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी वैशाली देशमुख यांचं एकप्रकारे कौतुकच केलं.
दरम्यान, यावेळी वैशाली देशमुख यांनी दिलेल्या उत्तरानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर, अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानंतर सभागृहात हशा पिकला, तसेच उपस्थितांनी टाळ्याही वाजवल्या.