पुणे : एफआरपीची थकीत रक्कम न देताच खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविला असून संबंधित साखर कारखान्यांचे गाळप परवाने कसे दिले,असा प्रश्न खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी साखर आयुक्तांना विचारला.तसेच भैरवनाथ शुगर कारखान्यांचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्याशी मोबाईलवर संभाषण केल्यानंतर झालेल्या वादानंतर शेट्टी यांनी आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन केले. शेतक-यांना एफआरपीची रक्कम न देता काही साखर कारखान्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गाळप परवाना मिळविला.त्याबाबत चर्चा करण्यासाठी शेट्टी यांनी साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याशी संवाद साधला. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.सोनारी या कारखान्याने शेतक-यांची एफआरपीची रक्कम थकवल्याची तक्रार आयुक्तांकडे केली.यावेळी शेतक-यांच्या तक्रारीचे निवेदन दिले. त्यावर साखर आयुक्तांनी फोनवर भैरवनाथ शुगर कारखान्यांचे अध्यक्ष तानाजी सावंत यांना एफआरपी दिली की नाही असा प्रश्न विचारला.त्यावर संपूर्णपणे रक्कम दिली असे त्यांनी सांगितले. दरम्यान सावंत यांनी शेट्टी यांच्याशी सुध्दा मोबाईलवरून संवाद साधला. एफआरपी मिळाली नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत,शेट्टी यांनी सांगितले.त्यावर मी शिवसेनेचा नेता असून दहा कारखान्यांचा चेअरमन आहे. एफआरपी दिली, नाही दिली तरी तुमचा काय संबंध? थकीत एफआरपी विषयी आम्ही आणि साखर आयुक्त पाहून घेऊ. असे सावंत शेट्टी यांना म्हणाले.त्यानंतर शेट्टी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन गाळप परवाना घेणा-या सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करण्याची मागणी केली. तसेच कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालयातून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. शेट्टी यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर साखर आयुक्तांनी शुगर वर्क्स कारखान्याचा चालु वर्षाचा (२०१८-१९) ऊस गाळप परवाना तात्पुरता निलंबित करण्याचे आदेश दिले.त्यानंतर शेट्टी यांनी आंदोलन स्थगित केले. शेट्टी म्हणाले , राज्यातील १५ ते १६ कारखान्यांनी २०१७-१८ मधील एफआरपीची रक्कम दिली नसल्याची आमची माहिती आहे, गाळप परवाने दिलेल्या कारखान्यांची यादी आम्ही मागितली आहे. साखर आयुक्त कार्यालयाला खोटी माहिती देऊन गाळप परवाना घेतलेल्या कारखान्यांवर कारवाई करावी,अशी आमची मागणी आहे. तसेच सर्व शेतक-यांना एफआरपीची रक्कम दिल्याबद्दल कारखान्यांकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे,अशीही मागणी आयुक्तांकडे केली आहे.काही कारखान्यांनी हंगामाच्या शेवटी दोन ते तीन महिने शेतक-यांना एफआरपीपेक्षा कमी रक्कम दिली आहे.त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या कारखान्यांना साखर गाळप परवाने कसे ? राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 4:09 PM
साखर आयुक्त कार्यालयाला खोटी माहिती देऊन गाळप परवाना घेतलेल्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे...
ठळक मुद्देउस्मानाबादच्या भैरवनाथ शुगरचा गाळप परवाना निलंबित भैरवनाथ शुगरचे संचालक तानाजी सावंत यांच्याशी फोनवर खंडांजगी एफआरपीसाठी राजू शेट्टी साखर आयुक्त कार्यालयात शेट्टी यांचे आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन