पुणे: सामान्य लोक पोलिस स्टेशन म्हटलं की थोडं सावधेनतेनेच वागतात. अजूनही आपल्या सामाजात पोलिस स्टेशनमधील प्रक्रियांबद्दल माहिती नसल्याने बरेच जण तिथं जाणं टाळतात. त्यामुळे बऱ्याचदा अनेकांना त्रास होत असताना किंवा त्यांना अडचणी असतानाही ते पोलिसांत जाणे टाळतात. पोलिस स्टेशनची भीती कमी व्हावी यासाठी पुणे पोलिसांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. समाज माध्यमांद्वारे पोलिंसात एफआयआर (FIR) कसा दाखल करावा याची माहिती दिली आहे.
'पोलिस स्टेशन किंवा चौकीत जाण्यापासून' ते 'तुमच्या हातात तक्रारीची प्रत मिळेपर्यंत' FIR प्रक्रिया प्रत्यक्षरित्या कशी पार पडते याबाबत पुणे नागरिकांना जागरूक करण्यासाठी आम्ही ह्या प्रक्रियेच्या ८ महत्वाच्या पायऱ्या समाविष्ट करत आहोत, अशा आशयाचे ट्विट करत पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याच्या पायऱ्या सांगितल्या आहेत.
पहिली पायरी:तुम्ही गुन्ह्याची माहिती ज्यांच्या न्यायाधिकारक्षेत्रात नोंदवायची आहे त्या जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा चौकीत जावे.
दुसरी पायरी: फ्रंट डेस्कवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तुम्ही घटना सविस्तरपणे सांगावी. पोलिस कर्मचारी तुमचे स्टेटमेंट सहसा कोऱ्या कागदावर लिहून घेतात.
तिसरी पायरी:ते हस्तलिखित स्टेटमेंट CCTNS प्रणालीच्या ऑपरेटरला दिले जाते ज्यामध्ये एफआयआर अधिकृतपणे नोंदवली जाते.
चौथी पायरी:कॉन्स्टेबलने दिलेले हस्तलिखित सीसीटीएनएस ऑपरेटर टाइप करते, सिस्टममधील संबंधित आयपीसी (IPC) कलमांची निवड करते आणि आढावा घेण्यासाठी एफआयआर प्रत तयार करते.
पाचवी पायरी:यानंतर सीसीटीएनएस ऑपरेटर FIR ची प्रिंट काढते आणि पुढील प्रक्रियेसाठी संबंधित कॉन्स्टेबलकडे लेखी जबाब आणि ती प्रत पाठवते.
सहावी पायरी:कॉन्स्टेबल ही प्रत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडे देतात. ते एफआयआर वाचून त्यातील कलमं किंवा इतर काही दुरूस्ती असेल तर सुचवतात.
सातवी पायरी:नंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तक्रारदार आपल्या तक्रारीची (FIR) प्रत घेण्यासाठी येतो.
आठवी पायरी:एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी तुम्हाला तुमच्या तक्रारीबाबत काही घडामोडी घडल्या तर माहिती देतात. तुम्ही देखील काही शंका असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करून FIR क्रमांक सांगून माहिती प्राप्त करू शकता.